जळगाव मिरर | २९ जुलै २०२५
चोपडा तालुक्यातील अडावदकडून चोपड्याकडे जाणाऱ्या दुचाकी व बोलेरो पीकअप या चारचाकीच्या झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना २८ रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास अडावदजवळ असलेल्या कृषी विद्यालयाजवळ घडली. या मुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघातातील मयत तरुणांना तत्काळ चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील रहिवासी महेंद्र शांताराम दोडे (वय ३७) व युवराज तुकाराम तायडे (वय ३३) हे श्रावण महिन्यानिमित्त मध्य प्रदेशातील भिलटदेव बाबांच्या दर्शनासाठी दुचाकी (एमएच- १९, डीए- ३४९८) ने अडावदकडून चोपड्याकडे जात होते. दरम्यान, अडावद येथील कृषी विद्यालयाजवळ समोरुन येणाऱ्या बोलेरो पीकअप (एमएच १९, सीएक्स १४९०) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर दिनकर दोडे यांच्या फिर्यादीवरून बोलेरो चालक मनोज संजय पाटील (रा वेले, ता. चोपडा) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास भरत नाईक करत आहेत. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पो.कॉ. शेषराव तोरे यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
