जळगाव मिरर | १२ मार्च २०२४
धुळे येथून बऱ्हाणपूरकडे पहाटे ५ वाजता निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस व ट्रकचा विवरे गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून यात ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर प्रथमोपचार करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथून बऱ्हाणपूरकडे जाण्यासाठी मार्गस्थ झालेल्या बस (एमएच ४०, वाय- ५१९७) ही ११ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास विवरे गावाच्या स्मशानभूमीच्या कॉर्नरवरुन रावेरकडे जात होती. या वेळी समोरून येणाऱ्या ट्रक (एचआर- ५५, एक्स- २९८३) ने बसला ड्रायव्हर साईडने ट्रकने कट मारला. कट मारून पुढे नेण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हर साईटने बस पूर्णतः कापली गेली आहे. तर बस चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूच्या खड्ड्यात उतरवली म्हणून मोठा अनर्थ टळला. बसमध्ये ड्रायव्हरच्या बाजूच्या कंडक्टर सीटवर येथील आगार प्रमुखही बसलेले होते. या अपघातात ५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर बस खाली खडडयात उतरवल्याने १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये बस चालक दिलीप दयाराम पाटील, हुसेना इमाम कुरेशी (वय ६०), नसरीन सय्यद युनूस (वय ५५), मेहेक बी आयुब शेख (वय १७), सानिया इमाम कुरेशी (वय १७), सारिका मोरे (वय ४५), मेहमूद छबू तडवी (वय ३६) आदींचा समावेश आहे. त्यांना रावेर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पुढील उपचारार्थ हलवण्यात आले आहे. या याबसमध्ये एकूण ४९ प्रवासी होते. यातील उरर्वरित किरकोळ जखमी प्रवाशांवर रावेर, सावदा, फैजपूर आदी ठिकाणी खासगी रुग्णालयात उपचार होत आहेत.
हा अपघात घडताच रस्त्यावरील वाहनधारकांनी मदत केली. तर अपघाताचे वृत्त कळताच निंभोरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच विवरे गावात हि माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना पोलिसांच्या मदतीने तत्काळ रावेर येथे हलवले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून फैजपूर व जळगाव येथे रुग्णांना हलवण्यात आले आहे. या घटनेबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ट्रक व बस चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.