
जळगाव मिरर | २० मार्च २०२४
राज्यातील अनेक भागात अपघाताच्या नियमित घटना घडत असतांना नुकतेच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एका खासगी बसला भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या घटनेत बसमधील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने या अपघातात ४९ विद्यार्थी आणि शिक्षक बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली परिसरात बुधवारी दि.२० रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अपघातील जखमींना गगनगिरी महाराज आश्रमात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बस बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी निघाली होती. या बसमधून ४९ विद्यार्थी तसेच शिक्षक प्रवास करीत होते. बुधवारी सकाळी बस रायगडच्या दिशेने निघाली असता, जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील खोपोलीजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.
काही क्षणातच बस अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या भीषण अपघातात बसमधील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने ४९ विद्यार्थ्यांसह शिक्षक अपघातातून थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून उपचारासाठी गगनगिरी महाराज आश्रमात दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.




















