जळगाव मिरर | २ फेब्रुवारी २०२४
राज्यातील समृद्धी महामार्ग अनेक अपघाताने नेहमीच चर्चेत येत असताना वाशिम जिल्ह्यातील कार्ली गावाजवळ समृद्धी महामार्गावर लोकेशन १७३ जवळ रात्री १२ वाजताच्या सुमारास नीलगाय आडवी आल्याने खाजगी बस ट्रकला धडकून भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून यात जवळपास 27 प्रवाशी जखमी झाले असून त्यातील १० ते १२ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
नागपूर वरून पुण्याला प्रवाशी घेऊन जात असताना खाजगी बस समोर असलेल्या ट्रकच्या पुढे नीलगाय आडवी आल्याने ट्रक चालकाने नीलगाईला वाचवण्यासाठी तात्काळ ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. पूजा कंपनीची खाजगी ट्रॅव्हल्स नागपूर वरून पुणे येथे जात असताना वाशिम जिल्ह्यातील दोनद ते कारंजा दरम्यान कार्ली गावाजवळ समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कारंजा येथील गुरुदेव मंदिराच्या रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचून जखमींना तात्काळ कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी 27 प्रवाशी जखमी झाले असून त्यातील १० ते १२ प्रवाशी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. तर ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसानही झाले आहे. समृद्धी महामार्गावर जंगली प्राणी रस्ता ओलांडताना बरेच अपघात यापूर्वी सुद्धा झाले आहेत. समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे ही मालिका कमी करण्यासाठी जंगली प्राणी समृद्धी महामार्गावर येणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.