जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२५
मुलाकडून मानसिक छळ आणि मारहाणीला कंटाळून पित्याने मुलाचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या करत जीवन संपवले. पित्याच्या खिशात सापडलेल्या सुसाइड नोटमुळे दोन दिवसांनी या घटनेचा उलगडा झाला. त्यांचा मुलगा हितेश विठ्ठल पाटील (वय २२) रिल्स स्टार होता. त्याचे लाखो फालोअर्स होते.
सविस्तर वृत्त असे कि, माजी सैनिक विठ्ठल पाटील हे भवरखेडा (ता. एरंडोल) येथील मुळ रहिवासी असून ते आपल्या कुटुंबासह एरंडोल येथे वृंदावन नगरात वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा हितेश विठ्ठल पाटील हा प्रसिद्ध रिल्स स्टार होता. मात्र तो वडिलांपासून वेगळा राहात होता. मंगळवारी विठ्ठल पाटील यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांचा मुलगा उपस्थित नव्हता. शिवाय तीन-चार दिवसांपासून तो गावातही दिसत नव्हता. याची गावात उलट-सुलट चर्चा सुरु होती. पोलिसांना याचा संशय आल्यानंतर माजी सैनिकाने मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागली. हे प्रकरण समोर येऊ नये म्हणून दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप गावकऱ्यांमधून करण्यात आला. मात्र, याचाही पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, हितेश याच्या पश्चात आई, पत्नी व चार महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे. पाच वर्षांपूर्वी त्याच्या भावानेही आत्महत्या केल्याची पुढे आली आहे. या घटनेमुळे एरंडोल तालुका हादरला आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
हितेश (मुलगा) हा दारु पिऊन सतत मानसिक छळ आणि मारहाण करत होता. त्याला कंटाळून भवरखेडा गावाच्या नाल्याजवळ त्याचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, असा मजकूर असलेली विठ्ठल पाटील यांची सुसाइड नोट पोलिसांना मिळून आली. त्यानूसार गुरुवारी पोलिसांना संबंधित ठिकाणी मृतदेह आढळून आला. सुती दोरीने तरुणाला फाशी दिली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.