जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२४
जळगाव शहरातील एका परिसरात कुटुंबियांसोबत झालेल्या भांडणामुळे विषारीद्रव्य प्राशन केलेला जतीन श्याम लेहलकर (वय २०) या तरुणावर दोन दिवसांपासून जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी त्याच्यावर उपचार सुरु असतांना सकाळी प्राणज्योत मालवल्याने तरुणाची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चौघुले प्लॉट परिससरात जतीन लेहलकर हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्यांचे नवीन बसस्थानक परिसरात दुकान असून तेथे पाणी बॉटलसह मोबाईल रिचार्ज करुन तो वडीलांना व्यावसायात हातभार लावित होता. दोन दिवसांपुर्वी त्यांचे कुटुंबियांसोबत किरकोळ भांडण झाले. त्या भांडणाचा राग मनात ठेवून जतीनने संतापाच्या भरात विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर तो ममुराबाद रोड परिसरात असलेल्या मंदिराजवळ गेला. याठिकाणी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने वडीलांना फोन करुन आपण विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती दिली. त्याच्या वडीलांनी तात्काळ त्याठिकाणी जावून मुलगा जतीनला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
दोन दिवसांपासून सुरु होती मृत्यूशी झुंज विषारी द्रव्य प्राशन केल्यामुळे जतीनची प्रकृती चिंताजनक होती. दोन दिवसांपासून त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना बुधवारी सकाळच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच त्याच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला होता.