
जळगाव मिरर | १७ मार्च २०२६
चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी परिसरात रविवारी (१५ रोजी) रात्री झालेल्या गोळीबारात एका रिक्षाचालकाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत रेल्वे स्टेशनजवळील अनिल नगर येथील सिकंदर शेख निसार शेख (वय ३६) हा रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकित, मेहुल, कृष्णा शेळते (तसेच अन्य दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास हनुमानवाडी येथील एका शेडमध्ये आरोपींकडे दोन गावठी कट्टे होते. यावेळी एका आरोपीकडून ट्रिगर दाबला गेल्याने गोळी सुटली आणि ती सिकंदर शेख यांच्या उजव्या खांद्यावर लागली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी चाळीसगाव सिटी पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न (खुनाचा प्रयत्न) तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली असून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी व त्यांच्या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.




















