जळगाव मिरर | २५ डिसेंबर २०२५
चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात चाळीसगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन मुख्य आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच या आरोपींनी ज्या व्यक्तीकडून शस्त्रे घेतली होती, त्याच्या घरावर छापा टाकून आणखी एक गावठी कट्टा व दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत.
दि. १९ रोजी शहर पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करत पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार विनोद पाटील, भूपेश वंजारी व पोकों. गोपाल पाटील यांच्या पथकाने सापळा रचून धुळे रोड परिसरातून दीपक सुभाष मरसाळे (रा. सुवर्णाताई नगर) व अतुल गोकूळ कसबे (रा. इंदिरा नगर, बस स्थानकामागे, चाळीसगाव) यांना अटक केली.
न्यायालयाने या दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौकशीत त्यांनी लक्ष्मण प्रथमेश भामरे व अमीर शेख शमशोद्दीन शेख (दोघेही रा. चाळीसगाव) यांच्याकडून गावठी कट्टे घेतल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथमेश भामरे याच्या घराची झडती घेतली असता तेथून एक गावठी कट्टा व दोन जिवंत राऊंड मिळून आले.
या दोन घटनांमध्ये पोलिसांनी एकूण तीन गावठी कट्टे (पिस्तूल), सहा जिवंत राऊंड व चार रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रथमेश भामरे याच्याविरोधात पोकॉ. मोहन सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या वतीने “२०२६ हे चाळीसगाव शहर सुरक्षित शहर” ही संकल्पना राबविण्याचा निर्धार करण्यात आला असून, या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षाविषयक जनजागृती केली जात आहे.




















