
जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी रविवारी दि.१४ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला आहे. आरोपींनी सलग ४ राऊंड फायर केल्याची माहिती आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा घटना घडली तेव्हा सलमान खान घरीच होता. दरम्यान, गोळीबाराची घटना घडताच पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवली आहे. कोणत्याही अज्ञात व्यक्तीला परिसरात येण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. याआधीही सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी लॉरेन्स बिष्णोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्यातील उद्दिष्ट आहे, असं कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने एका टेलिव्हिजन मुलाखतीत घडपणे सांगितले होतं.
लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला होता. काही दिवसांपूर्वी अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील निवासस्थानावरही लॉरेन्स बिश्नोईने हल्ला केला होता. सलमान खानसोबतच्या जवळच्या संबंधांमुळे हा हल्ला झाल्याचे म्हटले होते. सलमान खानला सध्या वाय प्लस सुरक्षा पुरवली जाते.