जळगाव मिरर | ३१ मार्च २०२४
गेल्या काहीदिवसांपासून राजकीय वर्तुळात प्रतीक्षा लागून असलेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी अखेर शनिवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली. पाच जणांच्या या यादीत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, नीलेश लंके, अमर काळे, भास्कर भगरे यांच्या नावांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केलेल्या या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामतीमधून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तसेच नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आलेल्या माजी आमदार नीलेश लंके यांना संधी देण्यात आली आहे. वर्ध्यातून अमर काळे यांना तर दिंडोरीतून भास्कर भगरे यांना संधी देण्यात आली आहे.
बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांच्या भावजय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे. यामुळे बारामतीत आता नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होणार आहे. शिरूरच्या जागेवर अमोल कोल्हे यांची लढत नुकतेच शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी होण्याची शक्यता आहे. नगर दक्षिणच्या जागेवर उमेदवारी जाहीर झालेल्या नीलेश लंके यांची थेट लढत भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे-पाटील यांच्याशी होणार आहे, तर दिंडोरीच्या जागेवर भास्कर भगरे यांची लढत केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.