जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२५
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत प्रभाग क्रमांक १२ (क) मधून दीपाली अनुप पानपाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे संबंधित प्रभागात निवडणूक चर्चांना वेग आला असून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दीपाली पानपाटील यांचे पती अनुप पानपाटील हे पत्रकार असून प्रभागातील नागरी समस्या, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी तसेच स्थानिक प्रश्नांची त्यांना सखोल जाण आहे. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत नागरिकांसाठी आवाज उठवला आहे.
विशेषतः आरोग्य क्षेत्रात अनुप पानपाटील हे सक्रिय असून गरजू रुग्णांना उपचारासाठी मार्गदर्शन करणे, आवश्यक समन्वय साधणे तसेच प्रशासनाशी संपर्क साधण्याचे कार्य त्यांनी वेळोवेळी केले आहे. यासोबतच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही पानपाटील कुटुंबाकडून विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगण्यात आले. दीपाली पानपाटील यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग १२ (क) मधील निवडणूक लढतीला चुरस निर्माण झाली असून येत्या काळात प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.





















