जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२३
देशातील अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाने चांगलच धुमाकूळ घातला असून सिक्किममध्ये ढगफुटी होऊन आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे पश्चिम बंगाल,बिहार, झारखंडमध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, देशात परतीच्या पावसाचा जोर आणखीच वाढणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तर ओडिशामध्ये पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. यासोबतच पूर्व भारतातील काही भागांमध्येही मुसळधार पाऊस होईल.
स्कायमेट हवामान अहवालानुसार, पुढील २४ तासांत पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि आसामच्या पश्चिम भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार, झारखंड, उत्तर ओडिशा आणि आग्नेय उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर उत्तर छत्तीसगड, ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे, गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याचा अंदाज आहे. अरुणाचल प्रदेशात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
नागालँड आणि मणिपूरमध्ये गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज असून पश्चिम आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील हवामानात कोणताही बदल होणार नसून दिवसभर ढगाळ वातावरण राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, कोल्हापूर, रत्नागिरी, रागयडमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.