जळगाव मिरर | १० फेब्रुवारी २०२५
जळगाव शहरात गेल्या तीन महिन्यापूर्वी बेकायदेशीररित्या गॅस पंप सुरु होता याठिकाणी झालेल्या स्फोटात तब्बल ६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता, त्यानंतर जळगाव शहरातील पोलीस खळबळून जागे झाले. त्यानंतर शहरात अनेक ठिकाणी सुरु असलेले बेकायदेशीररित्या गॅस पंप बंद करण्यात आले मात्र तरी देखील बेकायदेशीररित्या गॅस विक्रीसाठी एकाच ठिकाणी तब्बल ५० भरलेल्या गॅस सिलिंडरसह तीन रिकामे सिलिंडर, मोटार व इतर साहित्यही आढळून आले. एमआयडीसी पोलिसांनी ते जप्त केले आहे. ही कारवाई ८ फेब्रुवारी रोजी रात्री रामेश्वर कॉलनीत करण्यात आली. या प्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर कॉलनीतील राजपूत गल्लीमध्ये घर क्रमांक ३५ येथे किरण भागवत पाटील (५१) याने बेकायदेशीर गॅस विक्रीसाठी सिलिंडरचा साठा करून ठेवला होता. त्या ठिकाणी एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला असता तेथे गॅस विक्रीच्या उद्देशाने सिलिंडरचा साठा करून ठेवल्याचे आढळले.
त्यात २९ व्यावसायिक, २१ घरगुती भरलेले असे एकूण ५० भरलेले सिलिंडर आढळून आले. तसेच तीन रिकामे सिलिंडरही येथे होते. या सिलिंडरसह पोलिसांनी प्रेशर मोटर, चार फुटाचे पाईप, लोखंडी सॉकेट, इलेक्ट्रॉनिक पंप, वजन काटा असा एकूण एक लाख ६४ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला. या प्रकरणी पोकॉ योगेश घुगे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून किरण पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.