जळगाव मिरर | ६ मे २०२४
एरंडोल शहरातील म्हसावद रस्त्यावर श्रीकृपा जिनिंगजवळ चारचाकी गाडी, ट्रक, अॅपे रिक्षा व दुचाकी अशा चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील (मूळगाव सामनेर, ह. मु, ठाकरे कॉलनी, पाचोरा) हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोलहून म्हसावदकडे जाणाऱ्या ट्रकला (आरजे १०/ जीबी ८५२८) दुचाकी ओव्हरटेक करत होती. त्याचवेळा समोरून येणाऱ्या रिक्षाला (एमएच १९ व्ही १२६७) इरटीका (एमएच १८ बीसी१४०८) ओव्हरटेक करत होती. ही ओव्हरटेक करणारी दोन्ही वाहने समोरासमोर धडकल्याने अपघात झाला. या अपघातात वाहनांची धडक होऊन दुचाकीस्वार रामकृष्ण भागवत पाटील हा युवक जागीच ठार झाला.
यावेळी गणेश पाटील (खेडी), राजू भावसार (एरंडोल), विठ्ठल वंजारी (एरंडोल) तसेच उमरजे येथील काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल व सहकारी घटनेची माहिती मिळताच तत्परतेने अपघातस्थळी दाखल झाले. मयत युवक सुशिक्षित बेरोजगार असून, रोजगारासाठी जळगाव येथे मुलाखत देऊन घराकडे परत जात होता.