
जळगाव मिरर | ४ मार्च २०२४
राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या मालिका नियमित सुरु असताना नुकतेच लातूर-नांदेड महामार्गावरील महाळंग्रा शिवारात दि.३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कारने ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात मोहन बालाजी कोतवाल (वय २७) शिवराज हरिश्चंद्र लंकाढाई (वय २६) कृष्णा विठ्ठल मंडले (वय २४) आणि नर्मन राजाराम कात्रे (वय ३३) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. मृत तरुण नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. नांदेड येथील मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मंडके, शुभम किशोर लंकाढाई हे चौघे तरुण स्विफ्ट डिझायर कारने तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते.
दरम्यान, चाकूर तालुक्यातील महाळंग्रा शिवारात कार आली असता, कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातरच कार समोरून जात असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली. अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरक्षा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात चारही तरुणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, स्थानिकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.