जळगाव मिरर | २० जून २०२५
शहरातील महाबळ परिसराकडून कोल्हे हिल्सकडे वाहन घेवून भरधाव वेगाने जाणाऱ्या चालकाने रस्त्याने जाणाऱ्या अनेकांना धडक दिली. यामध्ये वंदना सुनील गुजराथी (वय ४९, रा. पार्वतीनगर) या महिलेला धडक दिली असून त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास महाबळ परिसरातील हेमंत क्लासेस समोर घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी वाहनचालक मोंटू सैनी (वय २६, रा. वाघ नगर) यास ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील वाघ नगरमध्ये राहणाऱ्या मोंटू शिवपाल सैनी या वाहन चालकाने त्याच्याजवळील (एमएच १९, ईपी १६९४) क्रमांकाचे वाहन घेवून भरधाव वेगाने जात होता. महाबळ परिसरातील हेमंत क्लासेस जवळून जात असतांना त्याने अनेक वाहन चालकांना धडक दिली. यामध्ये वाहन चालक गंभीर जखमी झाले. त्यानंतर पुढे गेल्यानंतर त्या वाहन चालकाने रस्त्याने जात असलेल्या वंदना गुजराथी यांना धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अनेकांना धडक दिल्यानंतर परिसरातील नागरिक त्या वाहनचालकाला पाठलाग करीत होते.
दरम्यान, वाहन चालकाने दर्गा परिसरात आपली वाहन सोडून तो तेथून पसार झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने वंदना गुजराथी यांना धडक दिल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाहन चालक मोंटू सैनी हा वाहन सोडून पसार झाल्यानंतर त्याला पाठलाग करणाऱ्यांनी कोल्हे हिल्स परिसरात पकडले. त्याला पब्लिक मार दिल्यानंतर तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर रामानंद नगर पोलिसांनी त्या मोंटू सैनीला ताब्यात घेत त्याचे वाहन देखील जप्त केले असून त्याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
