जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२५
शहरात विविध भागांमध्ये ‘लकी ड्रॉ’च्या नावाखाली 30 ते 48 महिन्यांच्या भिशा सुरू असून, त्यातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे गंभीर प्रकार दबक्या आवाजात सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. २ हजार, ५ हजार, १० हजार अशा रकमेच्या भिशा आकर्षक लाभाच्या आमिषाने राबविल्या जात आहेत. सुरुवातीला मोठा फायदा देण्याचे स्वप्न दाखवून नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो, मात्र शेवटी हा सर्व प्रकार ‘ठरवलेली फसवणूक’ असल्याचे स्पष्ट होत आहे.
या भिशांमध्ये सुरुवातीच्या महिन्यांमध्ये लाभ देण्याचे नाट्य रंगवले जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्याला पहिल्याच महिन्यात नंबर लागला, तर २ हजार रुपये मासिक भिशी भरणाऱ्या व्यक्तीस तब्बल 50 हजार रुपये दिले जातात आणि त्याला पुढे पैसे भरावे लागत नाही, असे सांगितले जाते. यामुळे इतर लोकही अशा भिशांमध्ये सामील होतात. मात्र यामागे असते एक काळजीपूर्वक आखलेली योजना. सुरुवातीचे काही भाग्यवान नंबर निघाले की, उर्वरित सदस्यांकडून पैसे उकळले जातात आणि नंतर हळूहळू भिशी चालक “सिस्टम स्लो” झाल्याचे कारण देऊन वेळ काढतात. काही वेळा महिन्याला केवळ एकच नंबर निघतो, तर काहीवेळा अनेक महिने कोणालाही पैसे मिळत नाहीत.
या भिशींमध्ये 300 ते हजार लोकांपर्यंत सदस्य सामील असतात. यामुळे भिशी चालकांना महिन्याला लाखोंचा नफा मिळतो. याचा गैरफायदा घेत काही भिशी चालक एकाचवेळी 3 ते 4 भिशा सुरू करतात, पैसा गोळा होऊ लागतो आणि अचानक गायब होतात. अनेक ठिकाणी भिशी चालकांनी शहर सोडून पळ काढत असतात. या प्रकारामुळे शेवटच्या टप्प्यावर असलेल्या सदस्यांचे हजारो, लाखो रुपये अडकतात. काहींचे तब्बल दोन ते तीन लाख रुपये गेले असून, त्यावर कुठेही थेट कायदेशीर प्रक्रिया होत नाही. कारण अनेक वेळा हे व्यवहार कोणत्याही कायदेशीर कराराशिवाय, केवळ ओळखीवर किंवा व्हॉट्सअॅप ग्रुपवरूनच केले जातात.
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांची आर्थिक लूट
सर्वात चिंतेची बाब म्हणजे, या प्रकरणांकडे प्रशासन आणि पोलिसांकडून फारसे लक्ष दिले जात नाही. कारण अनेक वेळा पीडित लोक भितीपोटी तक्रार करत नाहीत किंवा हे व्यवहार चिट्ठी, रजिस्टर किंवा तोंडी स्वरूपात झाल्याने पुरावे मिळवणे कठीण जाते.
नागरिकांनी सावध राहण्याची गरज
नागरिकांनी अशा ‘हाई रिटर्न – नो रिस्क’ अशा थरारक वागणुकीपासून सावध राहावे, कोणत्याही आर्थिक योजनांमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्या मागची पारदर्शकता, कायदेशीरता व योजनेची पार्श्वभूमी नीट तपासावी. भिशी चालकाची पार्श्वभूमी, यापूर्वी घेतलेल्या भिशा, पैसे वेळेवर मिळाले की नाही, याची खातरजमा न करता पैसे गुंतवणे म्हणजे आपल्या मेहनतीच्या पैशाचा जुगार लावणे आहे.
पुढील भागात पहा : भिशी कशा प्रकारे लावली जाते