जळगाव मिरर | ६ डिसेंबर २०२५
नाशिकच्या एका व्यक्तीने कंपनीच्या कॅन्टीनचा ठेकेदार असल्याचे खोटे भासवून जळगावातील व्यापाऱ्याची तब्बल १ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मालाचे पैसे देण्यास नकार देत व्यापाऱ्याला धमकावल्याचा देखील आरोप आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दाणा बाजार परिसरातील ५१ वर्षीय व्यापाऱ्यास २ जून रोजी सारंग देशपांडे (रा. नाशिक – पूर्ण पत्ता उपलब्ध नाही) या व्यक्तीने फोन करून स्वतःला एका कंपनीच्या कॅन्टीनचा ठेकेदार असल्याचे सांगितले. विश्वास संपादन करून त्याने त्याच दिवशी ट्रान्सपोर्ट वाहन फिर्यादीच्या दुकानावर पाठवले.
वाहनातून गहू, तांदूळ, तूर दाळ व मूग दाळ असा एकूण १ लाख १७ हजार रुपये किमतीचा माल उचलला. मात्र वारंवार मागणी करूनही त्याने पैसे दिले नाहीत, उलट फिर्यादी व्यापाऱ्याला धमकावल्याचेही समोर आले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून सारंग देशपांडे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.




















