जळगाव मिरर | १६ जून २०२३
जळगाव जिल्ह्यातील अनेक भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीसाठी जात असता याचीच दक्षता घेत खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने आषाढी एकादशीनिमित्त भुसावळ येथून पंढरपूर वारीसाठी मोफत विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार असून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी याला मान्यता दिली आहे.
२८ जून रोजी दुपारी १:३० वाजता पंढरीच्या वारीसाठी निघणार आहे. जळगाव व बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी व भाविकांसाठी मध्य रेल्वेतर्फे पंढरपूर वारीसाठी अनारक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी रावेर लोकसभेच्या खा. रक्षा खडसे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत रेल्वे राज्यमंत्र्यांनी १४ रोजी रक्षा खडसे यांना पत्राद्वारे मागणी मान्य करीत असल्याचे कळवले आहे.
नियोजित रेल्वेगाडीचे वेळापत्रकदेखील कळविले आहे. दि. २८ जून रोजी दु. १:३० वा भुसावळ स्टेशन येथून रेल्वेगाडी सुटेल दि. २९ जून रोजी पहाटे ३:३० वा पंढरपूर येथे पोहोचणार आहे त्याचदिवशी रात्री १०:३० वाजत परतीसाठी निघणार असून 30 जून रोजी १:३० वाजता भुसावळ येथे – पोहोचणार आहे. भाविकांनी रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खा रक्षा खडसे यांनी केले आहे.