जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२५
आज ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार. जगभरात हा दिवस ‘मैत्री दिन’ म्हणून साजरा केला जातो. एक असा दिवस जो केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता, नात्यांची वीण घट्ट करणारा, आठवणींना उजाळा देणारा आणि आयुष्यातील सर्वात मौल्यवान नात्याला मैत्रीला समर्पित आहे.
या खास दिवसामागे एक इतिहास आहे. ‘फ्रेंडशिप डे’ ही संकल्पना सर्वप्रथम अमेरिकेत १९३० च्या दशकात पुढे आली. जॉयस हॉल नावाच्या कार्ड कंपनीने लोकांमध्ये मैत्रीची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्याची कल्पना मांडली. पुढे १९९८ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने ‘विनी द पूह’ या प्रसिद्ध कार्टून पात्राला ‘मैत्री राजदूत’ म्हणून घोषित केलं, आणि २०११ मध्ये अधिकृतपणे ३० जुलै हा ‘आंतरराष्ट्रीय मैत्री दिन’ म्हणून घोषित करण्यात आला. मात्र भारतात व इतर आशियाई देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारीच हा दिवस लोकप्रियतेने साजरा केला जातो.
मैत्री ही नात्यांची ती सुंदर पायवाट आहे, जी रक्ताच्या नात्यांपेक्षाही खोल जाऊ शकते. काही नात्यांना शब्दांची गरज लागत नाही, केवळ एका नजरेतून समजून घेणारी जी मैत्री असते, तीच खरी मैत्री मानली जाते. आयुष्यात संघर्ष, एकटेपणा, अपयश आणि यश या प्रत्येक टप्प्यावर ज्या व्यक्ती आपल्या सोबत खंबीरपणे उभ्या राहतात, त्या म्हणजे खरे मित्र.
सध्याच्या युगात, विशेषतः सोशल मीडियाच्या प्रभावामुळे मैत्रीचं स्वरूप बदललं आहे. फेसबुकवर हजारो मित्र, इन्स्टाग्रामवर असंख्य फॉलोअर्स, व्हॉट्सअॅप ग्रुप्स यामुळे जणू मैत्रीचं डिजिटल रूप समोर येतंय. मात्र या आभासी दुनियेत खरी, निस्सीम मैत्री निर्माण करणं आणि ती जपणं ही मोठी जबाबदारी बनली आहे. सततची तुलना, व्यस्तता, आणि वाढती एकटेपणाची भावना यामुळे मैत्रीच्या अर्थावर परत नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
मित्र निवडताना आजच्या पिढीने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. बाह्य आकर्षण, स्टेटस किंवा उपयुक्तता यावर मैत्री टिकत नाही. खरी मैत्री टिकते – प्रामाणिकपणा, सहिष्णुता, समजूतदारपणा आणि वेळ दिल्यामुळे. चांगला मित्र तोच जो तुमच्या चुका दाखवतो, तुमचं कौतुक करतानाच आवश्यक तेव्हा थांबवताही येतो.
या काळात मैत्री टिकवण्यासाठी छोट्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात वेळोवेळी संवाद ठेवणं, एकमेकांना समजून घेणं, गरज नसताना देखील आठवण काढणं आणि क्षमाशील असणं. आयुष्यात कितीही यशस्वी झालो, तरी खऱ्या मैत्रीची जागा कुठलाही पुरस्कार, पैसा किंवा सोशल स्टेटस घेऊ शकत नाही. आजच्या दिवशी, हजारो मैत्री बँड्स हातात बांधले जातील, मेसेजेसची देवाण-घेवाण होईल, सोशल मीडियावर स्टोरीज आणि पोस्ट्स येतील. पण या सर्वामागची भावना खरी असेल, तरच मैत्रीचा खरा अर्थ उरतो. ‘मैत्री दिन’ ही एक संधी आहे – जुन्या मित्रांना पुन्हा एकदा भेटण्याची, मनातली सल बोलण्याची, आणि नव्याने सुरुवात करण्याची. आयुष्यात अशा व्यक्तींना वेळ द्या, जे तुमच्यासाठी वेळ काढतात, जे तुमचं खरं हित चिंततात आणि जे तुम्हाला न बोलताही समजतात. कारण शेवटी, आयुष्य कितीही बदललं, तरी मनापासूनची मैत्री हीच खरी शाश्वत गोष्ट असते.