जळगाव, ता. २२ : येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट सेल अंतर्गत इस्टीट्युट इनोव्हेशन कॉन्सिल व आयक्यूएसीच्या संयुक्त विद्यमाने संशोधन पद्धतीवर तीन दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. या कार्यशाळेला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून रायसोनी इस्टीट्युटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा तसेच इलेक्ट्रोनिक अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील, मॅकेनिकल विभागाचे प्रा. डॉ. दीपेन कुमार रजक, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंटचे विभागप्रमुख प्रा. सौरभ गुप्ता व प्रा. मोनाली शर्मा हे उपस्थित होते. या प्रसंगी संशोधनातील तज्ज्ञ मार्गदर्शक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी विषय निवडीपासून ते शोधप्रकल्प, प्रबंध सादर करण्यापर्यंत संशोधन पद्धतीतील विविध महत्वाचे टप्पे सविस्तर उलगडून मांडले. संशोधन पद्धत ही संशोधनातील अविभाज्य घटक आहे.
त्यामुळे संशोधन योग्यरित्या पूर्ण करण्याकरिता विशिष्ट संशोधन पद्धतीचा अवलंब करावाच लागतो. त्याबाबत संशोधनकर्त्याला त्याचा अभ्यास असावा लागतो व त्यानुसारच त्याचे संशोधन असायला हवे. विषय निवड, साहित्य संकलन, वर्गीकरण, सांख्यिकीय विश्लेषण, संदर्भ, गृहीतके, मांडणी, पुनरावृत्ती अशा अनेक बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यशाळेचे पहिले सत्र सारांश व प्रकल्प अहवाल या विषयावर होते. सोप्या भाषेत सारांश कसा तयार करावा, विषयाची निवड व प्रकल्प अहवाल तयार करताना येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी, याबाबत इलेक्ट्रोनिक अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. तुषार पाटील यांनी मार्गदर्शन केले. संशोधन पद्धतीचा वापर, नमुना निवड, आढावा कसा लिहावा, संदर्भसूची कोणत्या पद्धतीने मांडावी, याबाबत दुसऱ्या सत्रात रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंटचे विभागप्रमुख प्रा. सौरभ गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात प्रश्नावली व माहितीचे विश्लेषण या विषयी मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपेन कुमार रजक यांनी मार्गदर्शन केले. प्रा. मोनाली शर्मा यांनी प्रकल्प अहवालामध्ये निष्कर्ष व शिफारशी कोणत्या पद्धतीने लिहावेत व शब्दरचना, शब्दार्थ, वाक्यरचना टायपिंग व बाइंडिंग आदींबद्दल शेवटच्या सत्रात मार्गदर्शन केले. यात अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील १०० विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. यावेळी सहभागी विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.