
जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२५
चाळीसगाव शहरात अवैध पत्त्यांचे अड्डे चालवणाऱ्यांची गादी गुंडाळत चाळीसगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई केली. घाट रोडलगत असलेले ८५ गाळा कॉम्प्लेक्स शेजारी व चरण पेट्रोल पंपासमोरील स्मशानभूमीच्या भिंतीआड सुरु असलेल्या २ जुगार अड्ड्यांवर छापा टाकत ११ जुगाऱ्यांना गजाआड केले. तर तब्बल १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळताच शहर पोलिसांनी नियोजन करून ८५ गाळा कॉम्प्लेक्स शेजारी व चरण पेट्रोल पंपासमोरील स्मशानभूमी परिसर या दोन्ही ठिकाणी सापळा रचला. रात्री उशिरा अचानक टाकलेल्या छाप्यात जुगाऱ्यांचा खेळ उधळला गेला. हातात पत्ते व समोर रोकड ठेवून खेळ रंगात आलेल्या संशयितांना पोलिसांनी जागेवरच गाठले. पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेवून तब्बल १ लाख ९ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त मुद्देमालामध्ये रोख रक्कम, पत्ते व इतर साहित्याचा समावेश आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस निरीक्षक अमीतकुमार मनेळ यांच्या नेतृत्वात पो.उ.नि. संदीप घुले, हवालदार योगेश मांडोळे, पो.ना. नितिन आगोणे, पो.कॉ. नीलेश पाटील, कल्पेश पगारे, ज्ञानेश्वर पाटोळे व विलास पवार यांनी केली. या धडक कारवाईमुळे शहरातील जुगारी चांगलेच धास्तावले असून पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले आहे.




















