जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२५
समाजमाध्यमांवर ‘एक लाखाचे दहा लाख मिळतील’ असे आमिष दाखवून देशातील विविध भागातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर मुक्ताईनगर पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नकली नोटांसह पाच मोबाईल जप्त केले असून दोघांना अटक करण्यात आली आहे, तर एका आरोपीचा शोध सुरू आहे. ही घटना मुक्ताईनगरात घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की , फेसबुक, व्हिडिओ रिल्स व इतर सोशल प्लॅटफॉर्मवरून सोन्याची नाणी, नागमणी, रेड मर्क्युरी, काळी हळद, उलटी वासना आदींच्या नावाखाली मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणुकीस भाग पाडण्याचे प्रकार वाढले होते. कुऱ्हा दुरक्षेत्रातील मधापुरी, हलखेडा, लालगोटा, जोंधनखेडा व चारठाणा परिसरात नागरिकांना बोलावून मारहाण करत लूट केल्याच्या तक्रारी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अशा संशयास्पद व्हिडिओंचा मागोवा घेण्याचे आदेश दिले. दरम्यान, दि. २५ डिसेंबर रोजी ‘सावरिया सेट’ या फेसबुक प्रोफाईलवरून “एक लाख का दस लाख मिलेंगा, खरीदना है वही कॉल किजीए” असा २८ सेकंदांचा व्हिडिओ प्रसारित झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या व्हिडिओमध्ये नमूद मोबाईल क्रमांकांच्या आधारे तपास सुरू केला असता, तिघा आरोपींचा सहभाग उघडकीस आला.
या प्रकरणात लालगोटा (ता. मुक्ताईनगर) येथील देवकुमार शिवराज भोसले व सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले यांना अटक करण्यात आली असून शिवकुमार शमी भोसले याचा शोध सुरू आहे. अटकेदरम्यान पोलिसांनी ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे छाप असलेल्या ५०० रुपयांच्या १,०६५ नकली नोटा तसेच पाच अँड्रॉईड मोबाईल जप्त केले. या नकली नोटांचा वापर नागरिकांना फसवण्यासाठी केला जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चा-टे, पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील व मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, नागरिकांनी समाजमाध्यमांवरील आर्थिक आमिषांना बळी न पडता संशयास्पद व्हिडिओ अथवा फोन कॉल आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.




















