जळगाव मिरर | १ जुलै २०२५
राज्यातील विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. गजनी सरकार, विसरभोळा कारभार असे पोस्टर हातात घेऊन आमदार रोहित पवार विधान भवनात पोहोचले. शेतकरी कर्जमाफीचा सरकारला विसर पडल्याचा रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
प्रसार माध्यांसोबत बोलाताना रोहित पवार म्हणाले की, “आज विधिमंडळात कृषी दिन साजरा केला जाणार आहे. पण हे जे गजनी सरकार आहे, विसरभोळा कारभार अशी यांची परिस्थिती आहे. सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केले होते की आम्ही 7-12 कोरा करू, पण ती फक्त घोषणाच राहिली, त्यावर काहीही झाले नाही.”
“तसेच सन्मान निधी 3 हजार वाढ करू, शेतीला दिवसा वीज देऊ, मनरेगा निधी रोखला, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा, कशी मदत करणार आहे याबद्दल सरकारने सांगितले नाही, या सगळ्याचा सरकारला विसर पडला आहे,” असा रोहित पवार यांनी पोस्टरद्वारे टोला लगावला आहे
“शेतकऱ्याला, त्यांच्या लेकरांना, माता-भगिनींना सरकार विसरले आहे. गजनी प्रमाणे विसरभोळा सरकारचा कारभार चालू आहे. सरकारला फक्त राजकारण करायचे आहे. कृषिदिनानिमित्त शेतकऱ्यांना कर्जमाफी वर इतर योजना जाहीर कराव्या, योग्य वेळ म्हणजे निवडणुका आल्यावर, तोच योग्य वेळ आहे का? हे तरी सरकारने सांगावं,” असेही रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
