जळगाव मिरर | ६ मार्च २०२५
राज्यातील बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला आहे तसेच नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच सोशल मीडियावर बीडमधलीच आणखी एक घटना समोर आली आहे. यात काही गुंड एका व्यक्तीला बॅटीने बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती हा एका व्यक्तीला बॅटीने बेदम मारहाण करताना दिसते. तसेच एकजण त्या व्यक्तीच्या हाता पायाला धरून असल्याचे दिसते. यावेळी आणखी काही लोक आजूबाजूला असल्याचे समजते. मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव सतिश भोसले असल्याचे समजते. दरम्यान, पीडित व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही. मात्र अत्यंत क्रूरपणे या व्यक्तीला मारहाण केल्याचे दिसून येत आहे.
यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार टीका केली आहे. गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे, असे म्हणत या मारहाणीचा व्हिडिओ शेअर करत अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अद्याप शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सतिश भोसले या गुंडाने काही दिवसांपूर्वी बावी गावातल्या एका व्यक्तीला असेच मारहाण केले होते. या मारहाणीत पीडित व्यक्तीचे सगळे दात पडल्याचे समजते. या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, बीडमध्ये नेमके काय चालू आहे? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे. बीडमधील गुन्हेगारी पाहता सामान्य नागरिकांना आपल्याच शहरात आता सुरक्षित वाटत नसल्याच्या भावना समोर येत आहेत.
विशेष म्हणजे संतोष देशमुख यांचे प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. मराठवाड्यातील जालना येथे देखील एका धनगर समाजाच्या व्यक्तीला गरम सळईने चटके देत अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात एवढी क्रूरता कुठून निर्माण होत आहे असा प्रश्न पडत आहे.
