जळगाव मिरर | २३ डिसेंबर २०२३
केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये कपात जाहीर केली आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ३९.५० रुपयांनी कमी झाली आहे. या कपातीनंतर १ डिसेंबर रोजीच व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत प्रति सिलिंडर २१ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. नव्याने दर कपात केल्यामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल उद्योगाला मोठा दिलासा मिळणार आहे.
आता मुंबईत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १,७१० रुपये असेल. तर कोलकातामध्ये १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १,८६८.५०, चेन्नईमध्ये १,९२९ रुपये असेल. राज्य पातळीवरील करांमधील फरकामुळे किमतीतील हा बदल दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, सौदी कॉण्ट्रॅक्ट प्राइस हा एलपीजी किमतींसाठी बेंचमार्क मानला जातो. गेल्या आठवड्यात सौदी कॉण्ट्रॅक्ट प्राइसने जास्त पुरवठा झाल्यामुळे एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही भाव घसरले आहेत.
सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी स्वयंपाकाच्या गॅसचे दर ठरवतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किमती लक्षात घेऊन ही किंमत ठरवली जाते.