जळगाव मिरर | ३० जून २०२५
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘नेचर डे’च्या औचित्याने रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते रोप लावून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली फुलझाडे, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड शाळेच्या परिसरात केली. काही झाडांना माहितीपट व विद्यार्थ्यांची नावे लावून त्यांच्याकडून झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारण्यात आली.
या प्रसंगी शिक्षकांनी झाडांचे महत्त्व, प्रदूषण नियंत्रणातील त्यांचे योगदान, व जैवविविधतेच्या संवर्धनातील त्यांची भूमिका यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘एक विद्यार्थी – एक झाड’ या संकल्पनेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांचाही सहभाग उल्लेखनीय होता. इयत्ता आठवितील मोहम्मद अली खान याने सांगितले, “मी औषधी झाड लावले आहे. दररोज त्याला पाणी घालणार आणि त्याची काळजी घेणार.” तर इयत्ता नववीतील चि. उमंग जितेंद्र मोरे याने आनंद व्यक्त करत सांगितले, “हे झाड मोठं झालं की मला खूप अभिमान वाटेल की मी त्याला जीवन दिलं.”
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी सांगितले, “निसर्गाचे रक्षण हे केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता, ते आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हायला हवे. वृक्षारोपण ही केवळ सुरुवात आहे; खरे योगदान हे संगोपनातूनच मिळते.” कार्यक्रमातील आनंदाचे व प्रेरणादायक क्षण शाळेच्या कॅमेर्यात टिपण्यात आले. हे छायाचित्र प्रदर्शन लवकरच शाळेच्या फलकावर लावण्यात येणार असून पुढील वर्षभर ‘झाड संवर्धन मोहीम’ राबवून विद्यार्थ्यांना झाडांच्या नियमित देखभालीसाठी प्रोत्साहित करण्यात आले
