जळगाव मिरर | १५ ऑक्टोबर २०२५
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर तर्फे आज जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत शहरातील सर्व १९ प्रभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद लाभला असून जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोमाने उतरायला तयार आहे, असा विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आला.
ही बैठक पक्षाध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आली.
बैठकीत जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “जळगाव शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल जनतेचा विश्वास वाढत असून अनेक अन्य पक्षांचे संभाव्य उमेदवार देखील मनसेच्या संपर्कात आहेत. विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलन, निवेदन व रस्त्यावर उतरून लढा देणारा एकमेव पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे.” ते पुढे म्हणाले, “जळगाव महानगरपालिका निवडणुकीत मनसे सर्व १९ वार्डांमध्ये उमेदवार देणार असून जनतेच्या पाठिंब्याने मनसे ताकदीने ही निवडणूक लढवेल.”
बैठकीत महानगर अध्यक्ष विनोद शिंदे यांनी वार्ड रचना व मतदारयादी संदर्भात माहिती दिली, तर दुसरे महानगराध्यक्ष किरण तळले यांनी पुढील निवडणूक रणनीतीबाबत मार्गदर्शन केले.
या प्रसंगी उपमानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, चेतन पवार, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक अविनाश पाटील, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, राहुल चव्हाण, दीपक राठोड, पवन सपकाळे, ऐश्वर्या श्रीरामे, भूषण ठाकूर, ॲड. सागर शिंपी, खुशाल ठाकूर, तसेच महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भील, अनिता बोरसे, ज्योती खुरपुडे, शुभांगी कावळे, लता पाथरवट आणि सर्व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत महानगरपालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची प्राथमिक चाचपणी सुद्धा करण्यात आली.