
जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२५
शासकीय सेवेत राहून पदाचा गैरवापर करत स्वतःच्याच पत्नीच्या नावे असलेली खासगी गाडी शासकीय कामासाठी भाड्याने लावण्याचा प्रताप जळगाव वस्तु व सेवाकर (GST) विभागातील एका कर सहाय्यक अधिकाऱ्याने केला. एवढेच नव्हे, तर गाडी प्रत्यक्षात कमी चालवून कागदोपत्री जास्त किलोमीटर दाखवून शासकीय तिजोरीला पद्धतशीरपणे चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार एका व्हिसलब्लोअरमुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित अधिकाऱ्याला अकार्यकारी विभागात हलवले असून, वादग्रस्त वाहन करार रद्द केला आहे.
जळगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते व व्हिसलब्लोअर श्री. दीपककुमार पी. गुप्ता यांनी २० जून रोजी एका गोपनीय खबऱ्याच्या माहितीवरून थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे तक्रार पाठवून या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला. या एकाच ईमेलमुळे संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आणि कारवाईला वेग आला.
काय आहे नेमके प्रकरण?
जळगाव GST कार्यालयातील कर सहाय्यक अधिकारी श्री. तुकुड्डुदास नाइक यांनी आपल्या पदाचा घोर गैरवापर केला. त्यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावावर असलेली खासगी चारचाकी गाडी (क्र. MH19 EG 9420) ‘मे. दर्शन टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ या नावाने आपल्याच कार्यालयात भाडेतत्त्वावर लावली होती. शासकीय नियमांनुसार, कोणताही कर्मचारी आपल्या कुटुंबातील सदस्याच्या नावे असलेल्या मालमत्तेचा वापर करून शासकीय कामातून आर्थिक लाभ मिळवू शकत नाही.
याही पुढे जाऊन, नाइक यांनी या वाहनाच्या बिलांमध्ये मोठा गोलमाल केल्याचा आरोप आहे. गाडी प्रत्यक्षात कमी किलोमीटर चालवली जात असताना, बिलामध्ये मात्र जास्त किलोमीटर दाखवून शासनाकडून लाखोंची रक्कम लाटली जात होती. शिवाय, हे वाहन खासगी पासिंगचे असूनही त्याचा व्यावसायिक वापर होत असल्याने शासनाचा कर महसूलही बुडत होता.
व्हिसलब्लोअरची तक्रार आणि प्रशासनाची कबुली
श्री. दीपककुमार गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत नाइक यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियम आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या या तक्रारीची दखल घेत विक्रीकर उपआयुक्त (प्रशासन) कार्यालयाने ५ ऑगस्ट रोजी लेखी पत्र पाठवून कारवाई केल्याचे कळवले आहे.
काय कारवाई झाली?
१. वादग्रस्त वाहन करार रद्द: श्री. नाइक यांच्या पत्नीच्या नावावर असलेला ‘मे. दर्शन टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ सोबतचा वाहन करार तात्काळ बंद करण्यात आला आहे.
२. वाहन आरटीओकडे जमा: सदर वादग्रस्त वाहन (MH19 EG 9420) २७ जूनपासूनच परिवहन अधिकारी (RTO) कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
३. अधिकाऱ्याची उचलबांगडी: भ्रष्टाचाराचे आरोप असलेले कर सहाय्यक श्री. तुकुड्डुदास नाइक यांचे सध्याच्या पदावरून स्थानांतरण करून त्यांना अकार्यकारी (Non-executive) विभागात हलवून एकप्रकारे ‘साईडलाईन’ करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमध्ये चालणाऱ्या अशा अनेक गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एका जागरूक नागरिकाच्या तक्रारीमुळे भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, या प्रकरणी नाइक यांच्यावर केवळ प्रशासकीय कारवाई न होता फौजदारी गुन्हा दाखल होणार का, याकडे संपूर्ण जळगावकरांचे लक्ष लागले आहे




















