जळगाव मिरर | ८ नोव्हेबर २०२४
रावेर तालुक्यातील चोरवड येथील तपासणी नाक्यावर पोलिसांनी दोघांकडून चारचाकीसह जवळपास २२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मध्य प्रदेशातून रावेरकडे वाहनातून महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी रात्री गस्तीवर असलेले सपोनि अंकुश जाधव, पोकाँ विशाल पाटील, पोकाँ रवींद्र भांबरे, सचिन घुगे, संभाजी बिजागरे यांना याबाबत कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यांनी चोरवड येथील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी जावून ते थांबले. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास एक महिंद्रा बोलोरो कंपनीची चारचाकी (एमएच- ०४, एचवाय ६५१५) हि येतांना दिसली.
त्या गाडीला थाबंवून गाडीची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित केशर युक्त विमल गुटखा आढळून आला. पोलिसांनी २२ लाख १ हजार १६० रुपये किमतीच्या चारचाकी वाहनासह विमल गुटखा जप्त केला. याबाबत पो.कॉ. संभाजी बिजागरे यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रिजवान शेख रऊफ व शेख शोयब शेख शरीफ (दोघे रा. छत्री चौक, पठाणवाडी, फैजपूर, ता. यावल) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तपास सपोनि अंकुश जाधव करत आहेत