
जळगाव मिरर | ११ मार्च २०२६
शहरातील एका परिसरात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वेळोवेळी तरुणीचा पाठलाग करुन तिला माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर असे म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच तरुणीला मी तुझे लग्न दुसरीकडे होवू देणार नाही जर तू केले तर तुला व तुझ्या लहान भावाला मारुन टाकेल अशी धमकी देखील दिली. ही घटना फेब्रुवारी २०२५ ते दि. ८ मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी एका विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात १९ वर्षीय तरुणी वास्तव्यास असून त्या तरुणीचा फेब्रुवारी २०२५ पासून संशयित हा पाठलाग करीत होता. दरम्यान, दि. ८ मार्च रोजी संशयिताने त्या तरुणीला शामा फायरजवळ थांबवले आणि त्याचा हात तरुणीच्या खांद्यावर ठेवला. यावेळी तो तरुणीला माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर असे म्हणू लागला. त्यानंतर मी तुझे दुसरीकडे लग्न होवू देणार नाही, जर तू केले तर तुला आणि तुझ्या लहान भावाला जीवेठार मारुन टाकेल अशी धमकी देखील दिली. तरुणीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयिताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गणेश वंजारी हे करीत आहे.




















