जळगाव मिरर | २१ मार्च २०२४
शहरातील लक्ष्मीनगर परिसरात हातात तलवार घेवून कारमधून उतरणाऱ्या आदेश पांडूरंग सपकाळे (वय २७, रा. एसएमआयटी कॉलेज, म्हाडा कॉलनी) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लक्ष्मी नगरात मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एक इसम हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक लक्ष्मीनगरात गेले असता, संशयित आदेश सपकाळे हा त्याच्याजवळील (एमएच ०३, सीएम ०९५९) क्रमांकाच्या कारमधून हातात तलवार घेवून उतरत असतांना पथकाला दिसला. पथकाने छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून तलवार व कार जप्त करण्यात आली असून पोलीस कर्मचारी पोकॉ नितीन ठाकूर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोकॉ मुकेश पाटील, साईनाथ मुंढे, छगन तायडे यांच्या पथकाने केली.




















