
जळगाव मिरर | २२ मे २०२५
धर्म आणि जात न पाहता पाण्यात बुडणाऱ्या मित्राला वाचवणाऱ्या अमळनेरच्या इन्साफ खान हे गाळात रुतून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २० रोजी धुळे येथील एमआयडीसी तलावात घडली. मित्राला जीवदान देणाऱ्या ‘इन्साफ’ला मात्र नियतीने ‘इन्साफ’ दिला नाही.
सविस्तर वृत्त असे कि, मूळचा राजस्थान येथील आझाद खान हे कामानिमित्त मुंदडा बिल्डर्स यांच्याकडे जेसीबी चालक म्हणून काम करत होते. अमळनेर येथे ते भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांचा मुलगा इन्साफ हा धुळ्याला एसव्हीकेएम महाविद्यालयात बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाला शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी त्यांची विवाह निश्चित झाला होता. दरम्यान, १९ रोजी इन्साफ हा त्याचा मित्र मयूर गांगुर्डे यांच्यासोबत धुळे येथील अवधान एमआयडीसी तलावाकडे फिरायला गेले होते. तलावाकाठी अचानक फिरताना मयूरचा पाय घसरला आणि मयूर बुडायला लागला. क्षणाचाही विलंब न करता इन्साफ याने मित्राला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. अथक प्रयत्नाने त्यांनी मयूरला बाहेर काढले.
मयूरचे प्राण वाचले, मात्र इन्साफ गाळात अडकला. बाहेर येण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू झाला. तो गाळात बुडाला. तेवढ्यात जवळच असलेल्या कोळी बांधवांनी उडी मारली आणि इन्साफला बाहेर काढले. परंतु, त्याच्या नाकातोंडात गाळ गेल्याने त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय हिरे महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने त्यास खासगी रुग्णालयात पाठवले. त्यानंतर इन्साफला सिद्धेश्वर हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. तातडीने उपचार ही सुरू करण्यात आले. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही २० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास इन्साफची प्राणज्योत मालवली.
हिंदू, मुस्लिम मैत्रीला जागून इन्साफने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपला मित्र मयूरचे प्राण वाचवले. पण, निसर्गाने त्यालाच इन्साफ दिला नाही, म्हणून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तर घटनेचे वृत्त कळताच अमेय मुंदडा यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, धुळे, मोहाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पो.नि. शशिकांत पाटील हे ही मदतीला धावले. शवविच्छेदन करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी राजस्थानकडे रवाना करण्यात आला आहे.




















