
जळगाव मिरर | १० जुलै २०२४
तालुक्यातील बोरनार येथे बकऱ्यांचा चारा घेण्यासाठी गेलेल्या संजय हिरामण पाटील (वय ४७) यांना सर्पदंश झाल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास बोरनार गावात घडली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषीत करताच त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयातच मनहेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील बोरनार गावात संजय पाटील हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. शेतमजूरी व शेळीपालनाचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवार दि.९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता ते बकऱ्यांना चारा घेण्यासाठी गावाजवळील शेतात गेले. त्यावेळी झुडूपाजवळ चारा तोडत असतांना त्यांना संर्पदंश झाला. त्यामुळे त्यांना गावातील ग्रामस्थांनी तातडीने खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी डॉ. रक्षा रोकडे यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.





















