जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२४
राज्यातील अनेक शहरात महसूल व शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच सेवानिवृत्त शिक्षकाचे गट विमा योजनेचे उपकोषागार कार्यालयात बिल पाठविण्यासाठी अडवणूक करणारी मुख्याध्यापिका लाच घेताना रंगेहात पकडली गेल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत घडला. यात अर्चना बापूराव जगताप असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आश्रमशाळेतील सेवानिवृत्त शिक्षकाला गट विमा योजनेचे एक लाख ३३ हजार ४८४ रुपये मंजूर झालेले होते. त्याचे बिल शिंदखेडा येथील उपकोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी अर्चना जगताप यांनी ५ हजारांची मागणी केली. यासंदर्भात सेवानिवृत्त शिक्षकाच्या तक्रारीची १ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुपारी पडताळणी केली. तेव्हा तडजोडीअंती ४ हजारांची लाच स्वीकारत असताना त्यांना रंगेहात पकडले.
दोंडाईचा पोलिस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजर या पथकाने केले.