जळगाव मिरर | ९ जुलै २०२५
आई लहान भावाला घेवून बाहेर गेलेली असतांना बालक खेळण्यासाठी घराबाहेर पडला. शेजारी राहणाऱ्यांच्या घराबाहेर खेळत असतांना तेथे बांधलेल्या दोरीचा त्याला फास बसून हार्दीक प्रदीपकुमार अहिरे (वय १३, रा. मुंदडानगर) या बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुंदडानगरात घडली. या घटनेमुळे अहिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मुंदडा नगरात हार्दीक हा आई, वडील व लहान भावासोबत वास्तव्यास होता. त्याचे वडील प्रदीपकुमार अहिरे हे वास्तव्यास असून ते रावेर तालुक्यातील केहऱ्हाळा येथील माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत, तर आई गृहिणी आहेत. सोमवारी शाळा अर्धावेळ असल्याने हार्दीक हा दुपारी तीन वाजता शाळेतून घरी आला. जेवण केल्यानंतर तो घराबाहेर खेळायला जाण्याकरीता आईकडे आग्रह धरु लागला. मात्र पाऊस सुरु असल्यामुळे त्याच्या आईने त्याला बाहेर खेळायला जाण्यास मनाई केली. थोड्यावेळानंतर हार्दीकची आ-ई त्याच्या लहान भाऊ प्रसादला घेवून बाहेर गेली होती. त्यामुळे घरी एकटाच असलेला हार्दीक हा घराशेजार राहणारे पद्मसिंह परदेशी यांच्या घरी खेळायला गेला. परदेशी यांच्या घराच्या पोर्चमध्ये प्रशिक्षणासाठी एक दोरी बांधलेली होती. हार्दिक त्या दोरीजवळ खेळत असताना, त्याला अचानक त्या दोरीचा फास लागला.
पद्मसिंह परदेशी यांच्या पत्नी घरात असताना, त्यांना अचानक गळ्याला फास आवळला गेल्याने हार्दीकचा आवाज ऐकू आला. त्या लागलीच धावतच पोर्चमध्ये आल्या. यावेळी त्यांना हार्दीकच्या गळ्याला फास आवलेला दिसला. त्यांनी लागलीच आराडाओरड करीत हार्दीच्या आईला बोलावल्याने त्यांनी देखील लागलीच परदेशी यांच्या घराकडे धाव घेतली. घराबाहेर येताच त्यांनी फास लागलेल्या हार्दीकला लागलीच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत त्याला मयत घोषित केले. त्यानंतर, हार्दिकचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला.
