जळगाव मिरर | १८ मार्च २०२५
राज्यातील नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत 25 ते 30 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, 65 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दंगलखोरांनी सुमारे 25 दुचाकी आणि 3 कार जाळल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, औरंगजेबाच्या कबरीबाबतच्या वादानंतर हा हिंसाचार उफाळला. दंगलखोरांनी घरं, दुकानं आणि वाहनांवर हल्ले केले. स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्लेखोरांनी चेहरे झाकले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात कर्फ्यू लागू केला आहे आणि अतिरिक्त पोलीस दल तैनात केले आहेत. दंगलखोरांच्या ओळखीच्या दृष्टीने पोलिसांना काही आधारकार्ड आणि ओळखपत्रं सापडली आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, परंतु नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री व खा. नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अल्पसंख्याक आयोगाचे राज्य अध्यक्ष प्यारे खान आदीनी नागपूर शहरातील लोकांना शांतता बाळगावी, असे आवाहन केले. नागपुरात तणाव निर्माण होणे, हे दुर्दैवी आहे. नागपूरचा इतिहास शांततेचा राहिला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नागपूरकरांनी शांतता बाळगून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. परिस्थिती आता नियंत्रणात असून, कुणीही कायदा हातात घेऊ नये. आमचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. ३० संशयितांना ताब्यात घेतले आहे, असे नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सांगितले.