
जळगाव मिरर | १ एप्रिल २०२६
सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारी संतापजनक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. कोठडीत असलेल्या एका महिलेकडे तिच्या मुलीला शरीरसुखासाठी आपल्याकडे पाठवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप एका सहायक पोलिस उपनिरीक्षकावर झाला आहे. या गंभीर प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करत त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
राजेश जाधव असे आरोपी एएसआयचे नाव असून, तो सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात कार्यरत होता. उपलब्ध माहितीनुसार, आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका महिलेला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. त्या दरम्यान, मंगळवारी रात्री कर्तव्यावर असलेल्या जाधव यांनी संबंधित महिलेकडे अत्यंत अश्लील आणि गैरवर्तनपूर्ण मागणी केली. त्यांनी महिलेला पैशांचे आमिष दाखवत “तुझ्या मुलीला शरीरसुखासाठी माझ्याकडे पाठव” अशी मागणी केल्याचा आरोप आहे.
या घटनेने हादरलेल्या महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आणि पोलिस दलात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपी जाधव यांची कठोर शब्दांत कानउघाडणी केली. “वर्दी घालून असे कृत्य करताना तुला लाज वाटली नाही का?” अशा शब्दांत त्यांनी जाधव यांना फैलावर घेतले. या प्रसंगाचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यात अधिकारी संतप्त अवस्थेत आरोपीला जाब विचारताना दिसतात.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत जाधव यांना निलंबित केले असून त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस कोठडीत असणाऱ्या महिला कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी न्यायालयांनी दिलेल्या स्पष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार, महिलांची अटक, चौकशी आणि तपासणी महिला पोलिसांकडूनच केली जाणे बंधनकारक आहे. तसेच सूर्यास्तानंतर महिलांना अटक टाळावी, त्यांना स्वतंत्र आणि सुरक्षित कोठडीत ठेवावे, चौकशीदरम्यान महिला अधिकारी उपस्थित असावी, तसेच सीसीटीव्ही देखरेख असणे आवश्यक आहे. या सर्व नियमांचे पालन होत आहे का, याबाबतही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेतील शिस्त, जबाबदारी आणि संवेदनशीलतेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.






















