जळगाव मिरर | १८ जुलै २०२५
मुंबई येथे गुरुवारी संध्याकाळी झालेल्या राड्यावरून विधिमंडळ परिसरात रात्रभर हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात नेत असताना आव्हाडांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. शेवटी पोलिसांनी आव्हाडांना फरफटत बाजूला नेले.
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातल्या शाब्दिक चकमकीचे तीव्र पडसाद गुरुवारी विधानभवनात उमटले. आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार हाणामारी झाली. एकमेकांना शिव्यांच्या लाखोल्या वाहण्यात आल्या. या झटापटीत टकले याने आव्हाड देशमुख याचा शर्ट फाडला. शेवटी सुरक्षा रक्षकांनी या दोघांना मागे खेचले. त्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांनी बघून घेऊ अशा धमक्या परस्परांना दिल्या.
रात्री उशिरा पोलिसांनी आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला ताब्यात घेतले. हा प्रकार समजताच आव्हाड पुन्हा विधिमंडळात आले. त्यांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. विधानसभा अध्यक्षांनी मला सांगितले होते की विधिमंडळाचे काम संपल्यानंतर आम्ही यांना सोडून देऊ. परंतु असे न करता ते पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत. त्यामुळे आम्ही आता इथून कोणालाही पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ देणार नाही असा पवित्रा जितेंद्र आव्हाड यांनी घेतला.
आव्हाडांना चकवा देण्यासाठी पोलिसांनी नितीन देशमुखला दुसऱ्या गाडीतून पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार समजताच आव्हाडांनी गाडी अडवली. शेवटी पोलिसांनी फरफटत आव्हाडांना बाजूला नेले.
यानंतर आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी मरीन ड्राइव्ह आणि आझाद मैदान पोलिस ठाण्यासमोर महायुती सरकारविरोधात निदर्शने आणि घोषणाबाजी केली. मारहाण झालेल्यांनाच पोलीस तुरुंगात डांबतायत तर मारहाण करणारे मोकाट आहेत, असा आरोप आव्हाडांनी केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात विधान भवनाबाहेर मध्यरात्री ३ वाजेपर्यंत निदर्शने केली. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांनी दावा केला की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा समर्थक नितीन देशमुख याला कालच्या कामकाजानंतर सोडले जाईल असे स्पष्ट केले होते. तथापि, पोलिसांनी दोन्ही संबंधित पक्ष कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना स्थानिक पोलिस ठाण्यात नेले. यामुळे संपूर्ण परिस्थिती चिघळली आणि मध्यरात्री निदर्शने सुरू झाली.
