जळगाव मिरर | ७ ऑक्टोबर २०२४
देशातील अनेक ठिकाणी नियमित अपघाताच्या घटना घडत असतांना आज गुजरातमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अंबाजी सोमवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, तर 35 हून अधिक जण जखमी झाले. ५ ते ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजीतील त्रिशूलीया घाटात बसचे नियंत्रण सुटून दरीच्या रेलिंगला धडकून बस उलटून अपघात झाला. जखमींना पालनपूर आणि अंबाजी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एका प्रवाशाने सांगितले की, घाटावर बस चढत असताना ड्रायव्हर मोबाइलने रील बनवत होता. आम्ही त्याला मनाई केली होती तरीही तो रील बनवण्यात व्यस्त राहिला. दरम्यान, घाटावरील हनुमान मंदिराजवळ रेलिंगला धडकल्याने बस पलटी झाली. चालक घटनास्थळावरून पळून गेला.
त्याचवेळी बसमधील काही प्रवाशांनी सांगितले की, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. यामुळे अपघातानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्याला लवकर पकडून त्याची वैद्यकीय चाचणी केल्यास संपूर्ण सत्य बाहेर येऊ शकेल. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही बस अंबाजी मंदिराकडून दांता शहराच्या दिशेने परतत होती. बसमध्ये प्रवास करणारे सर्व जण मातेचे दर्शन घेऊन दांता शहरात येत होते. अपघातात बळी पडलेले बहुतांश भाविक हे खेडा जिल्ह्यातील कथलाल गावचे रहिवासी आहेत. बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच जखमींना मदत करण्यासाठी लोक जवळच्या गावात पोहोचले. अनेकांनी जखमींना खासगी वाहनातून अंबाजी रुग्णालयात दाखल केले.