जळगाव मिरर | २१ जानेवारी २०२५
राज्यातील नशिक जिल्ह्यातील घोटी- सिन्नर राज्य महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ कंटेनर व रिक्षात झालेल्या अपघातात दोघांसह बालिका ठार झाली, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातातील मृत व जखमी कल्याणमधील नांदवली येथील असल्याचे समजते आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घोटी-सिन्नर मार्गावर सोमवारी (दि. २०) सायंकाळी रिक्षा (एमएच 05 एफडब्ल्यू 0030) सिन्नरकडे जात असताना ओव्हरटेक करण्याच्या नादात रिक्षाने समोरून येणाऱ्या कंटेनरवर (एनएल 01 एएफ 0458) जाऊन धडकली. अपघातात रिक्षाचालक अमोल विनायक घुगे (२५, रा. नांदवली, कल्याण) हा जागीच ठार, तर स्वरा अमोल घुगे (४), मार्तंड पिराजी आव्हाड (६०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर प्रतीक्षा अमोल घुगे (२२) व कलावती मार्तंड आव्हाड (५८, रा. कल्याण) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक राम व्होंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना एसएमबीटीच्या रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघात प्रकरणी ट्रकचालक राहुल कुमार प्रजापती (२८, रा. झारखंड) याला सहायक पोलिस निरीक्षक राम व्होंडे यांनी पुढील तपासासाठी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या ताब्यात दिले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
सदर ठिकाणी झालेले अपघात स्थळ हे ब्लॅक स्पॉट नसून सदर अपघात हा रिक्षाचालकाने ओव्हरटेक केल्यामुळे झाला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राम व्होंडे यांनी दिली आहे. अपघातानंतर रस्त्यावरील दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताबाबत वाडीवऱ्हे पोलिस पुढील तपास करीत आहेत.