
जळगाव मिरर । १७ सप्टेंबर २०२५
पुणे येथे मुलाला भेटून जळगावकडे परतणाऱ्या कारला भरधाव ट्रेलरने धडक दिली. या अपघातात मिताली सुहास पाटील (वय ५८, रा. विनोबा नगर) या जागीच ठार झाल्या. तर त्यांचे पती सुहास राजाराम पाटील (वय ६०) व चालक योगेश बारी (वय ३५, रा. शिरसोली, ता. जळगाव) हे जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री अजिंठा घाटाच्या पायथ्याशी झाला. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील विनोबा नगरात राहणारे सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुहास पाटील व मिताली पाटील हे चालक योगेश बारी याच्यासह (एमएच ०३, एडब्ल्यू २६६१) क्रमांकाच्या कारने पुणे येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते. तेथून ते सोमवारी जळगाव येथे घरी परत येत होते. अजिंठा घाट उतरल्यानंतर टी पॉईंटनजीक मागून येणाऱ्या (एमएच २१, बीवाय ४९१६) क्रमांकाच्या ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ते थेट कारवर येऊन धडकले. कार या ट्रेलरच्या खाली दबून तिचा चक्काचूर झाला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रेलरखालून कार काढण्यात आली व कारमध्ये अडकलेल्या तिघांनाही जळगाव येथे आणण्यात आले. यामध्ये मिताली पाटील यांचा मृत्यू झाला. तर सुहास पाटील व योगेश बारी हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत




















