जळगाव मिरर | ७ सप्टेंबर २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सुरु असतांना आता धुळे तालुक्यातील वरखेडी फाटा परिसरात आज सकाळच्या सुमारास ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ट्रॅक्टरने हुलकावणी दिल्याने लोखंडी आसऱ्यानी भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन पुलाला जाऊन धडकला. या भीषण अपघातामध्ये ट्रकची कॅबिन पूर्णपणे दबली गेल्याने यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे कि, धुळे तालुक्यातील वरखेडी फाटा या ठिकाणी सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या महामार्गावरून ट्रक जात असताना अचानक एक भरधाव ट्रॅक्टर समोर आला. यामुळे ट्रॅक्टरला वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि हा अवजड ट्रक समोर असलेल्या पुलाच्या भिंतीवर जाऊन धडकला.
हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील जखमीला नागरिकांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्या जखमीची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघात इतका भयंकर होता कि, ट्रकचा कॅबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती.