जळगाव मिरर | ३० जुलै २०२५
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात मंगळवारी (२९ जुलै) सकाळी सहा वाजता शॉर्टसर्किटमुळे एक प्रवासी रिक्षा जळून खाक झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत गोकुळ सुकलाल अस्वार (वय ३५) या रिक्षाचालकाचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन नष्ट झाले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शिरसोली येथील रहिवासी गोकुळ अस्वार हे (एमएच १९ सीडब्ल्यू ६६५९) क्रमांकाची रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दररोजप्रमाणे त्यांनी रिक्षा घरासमोर पार्क केली होती. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षात अचानक शॉर्टसर्किट झाले आणि काही क्षणांतच ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
सकाळी सहाच्या सुमारास आगीची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गोकुळ अस्वार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धनराज गुळवे करीत आहेत.
