
जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२६
शहरातील खोटे नगर परिसरातील विठ्ठलवाडी येथे रविवारी (दि. १२ एप्रिल) दुपारी अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून घरातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी परिसरातील रहिवासी गोपाळ जगन्नाथ भक्त यांच्या घरात दुपारच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाले. काही क्षणांतच आगीने तीव्र रूप धारण केले आणि घरातील फ्रिज, विद्युत वायरिंग व इतर साहित्य जळून खाक झाले. फ्रिजचा कॉम्प्रेसरही लिक झाल्याचे समोर आले. मात्र वेळेत आग नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, परिसरातील रहिवासी रवींद्र गिते यांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी प्रकाश चव्हाण, प्रकाश कुमावत, तेजस जोशी, संजय तायडे आणि भूषण पाटील यांनी तत्परतेने काम करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.





















