जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२४
देशात गेल्या काही महिन्यापासून महागाई वाढत असतांना आता बाजारात जाणाऱ्या प्रत्येक माणसाला लाल मिरचीचा ठसका महाग होणार आहे. लसणापाठोपाठ आता लाल मिरचीच्या किमती २० ते २५ टक्के वाढल्या आहेत. यात आणखी वाढ होऊ शकते, असा व्यावसायिकांचा अंदाज आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
मियाचाउंग वादळामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील मिरच्यांचे पीक मोठ्या प्रमाणात वाया गेले आहे. कर्नाटकातही कमी पावसामुळे उत्पादन घटले आहे. त्यामुळे लाल मिरच्यांची मागणी व पुरवठ्याचे गणित कोलमडले आहे. त्यातच यंदा मिरच्यांची निर्यातही मजबूत आहे. चीनमध्ये तेजा जातीच्या भारतीय लाल मिरचीस मोठी मागणी आहे. अशा अनेक कारणांमुळे लाल मिरच्या महागल्या आहेत.