जळगाव मिरर | २९ जुलै २०२५
राज्यातील महायुती सरकारचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त कृतींमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात कोकाटे यांची भेट घेऊन त्यांना कडक शब्दांत समज दिल्याची माहिती समोर आली आहे.
“बोलताना भान ठेवा, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय,” असं अजित पवार यांनी कोकाटे यांना सुनावलं आहे. कोकाटे यांच्या विधानसभेतील रमी गेम खेळण्याच्या व्हिडीओ प्रकरणाने आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी महायुती सरकारला अडचणीत आणले आहे.
पावसाळी अधिवेशनादरम्यान माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत मोबाइलवर ‘जंगली रमी’ खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडीओ शेअर करत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याशिवाय, कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत “पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, याचा अर्थ सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानेही मोठा वाद निर्माण केला.
आज (२९ जुलै) मंत्रालयात झालेल्या भेटीत अजित पवार यांनी कोकाटे यांना त्यांच्या कृती आणि वक्तव्यांवरून समज दिली. “कृषिमंत्री असो वा कोणीही, लोकांसमोर बोलताना तारतम्य ठेवावे. तुमच्या चुकीमुळे सरकारची बदनामी होत आहे,” असे पवार यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही कोकाटे यांना दोनदा समज देण्यात आली होती. “इजा, बिजा झाला, तिजाची वेळ आणू नका,” असे सांगत पवार यांनी कोकाटे यांना तिसऱ्या चुकीसाठी गंभीर परिणामांचा इशारा दिला होता.
कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदाची राजीनामा घेऊ नये, अशी मागणी घेऊन नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते मंत्रालयात आले होते. या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. त्यावेळी अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांना प्रतिसवाल केला. किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करायचं? आता राजीनामा नको म्हणून आपण आला आहेत. मात्र, ज्यावेळी मी स्वतःहून मंत्रिपद दिलं त्यावेळी कुणीही आलं नव्हतं. सतत चुका होतं असल्यामुळे आता माफी नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडल्याची माहित समोर ययेत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
