जळगाव मिरर | २१ जानेवारी २०२५
राज्यातील महायुती सरकारने नाशिक व रायगड जिल्ह्याला पालकमंत्री जाहीर केल्यानंतर महायुतीत नाराजी निर्माण झाल्यानंतर या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता 26 जानेवारी रोजी मंत्री महाजन हेच ध्वजारोहण करणार आहेत. याबाबत, राज्य शासनाने आदेश काढले असून, जिल्हा प्रशासनाला पत्रदेखील प्राप्त झाले आहे. मंत्री महाजन यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती मिळाल्याने ध्वजारोहण कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
राज्य सरकारकडून सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. यात रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे आणि नाशिकमधून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे हे इच्छुक होते. नाशिकचे पालकमंत्रिपद महाजन यांच्याकडे गेल्याने दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राज्य सरकारकडून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती दिली गेल्याने 26 जानेवारीला ध्वजारोहण कोण करणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. परंतु, शासनाने परिपत्रक काढून नाशिक येथे महाजन व रायगड येथे अदिती तटकरे या ध्वजारोहण करतील, असे नमूद केले आहे.