
जळगाव मिरर | २२ एप्रिल २०२५
देशभरातील ग्राहकांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. येत्या काही दिवसावर अक्षय तृतीया सण येवून ठेपला असतांना आता मंगळवारी सोन्याच्या किमतीत प्रचंड उसळी दिसून आली. दिल्लीच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,800 रुपयांनी वाढून 1,01,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला, जो आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक आहे. अक्षय तृतीया आणि लग्नसराईच्या हंगामापूर्वी खरेदीदारांची वाढती गर्दी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जात आहे, त्यामुळे किमतीत सातत्याने वाढ होत आहे.
ऑल इंडिया सराफा असोसिएशननुसार, दिल्लीत 99.9% शुद्धतेचे सोने सोमवारी 99,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, ते मंगळवारी 1,800 रुपयांनी वाढून 1,01,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. तर 99.5% शुद्धतेचे सोने 2,800 रुपयांच्या तीव्र उसळीसह 1,02,100 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेले, जे सोमवारी 99,300 रुपये होते.
30 एप्रिल रोजी येणारी अक्षय तृतीया भारतात सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानली जाते. शिवाय, मे अखेरपर्यंत चालणारा लग्नसराईचा हंगाम यामुळे बाजारात सोन्याची खरेदी वाढली आहे. या दोन्ही घटकांमुळे सोन्याच्या किमतीवर स्पष्ट परिणाम दिसून येत आहे.
गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. डिसेंबर 2024 पासून आतापर्यंत सोने प्रति 10 ग्रॅम 22,650 रुपयांनी महागले आहे, म्हणजेच सुमारे 29% ची उसळी दिसून आली. दुसरीकडे, चांदीच्या किमती मंगळवारी स्थिर राहिल्या आणि त्या 98,500 रुपये प्रति किलोग्रॅमवर कायम राहिल्या.