
जळगाव मिरर । ९ डिसेंबर २०२२
राज्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी चर्चेत येत असतात तर आज पुणे येथील एका कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले कि, ‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, असं वक्तव्य केल्याने आता ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. पुण्यातील डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने वार्षिक पुरस्कार सोहळ्यात कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे. कोश्यारींच्या या वक्तव्यामुळं ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
नेमकं काय घाडलं होतं?
राज्यपाल यांचे भाषण सुरू झाले. त्यावेळी त्यांच्या समोरील बाजूला व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्याच्या मागे एक महिला बसली होती. त्या महिलेला व्यासपीठावरील राज्यपाल दिसत नव्हते. त्यामुळे तिने राज्यपालांना दुसर्या बाजूच्या डायसवर येऊन बोलण्याची विनंती केली. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तुम्हाला भाषण ऐकायचं आहे की बघायचं आहे, असा मिश्किलपणे प्रश्न विचारताच सभागृहात एकच हशा पिकला. कोश्यारी म्हणाले. ‘मैं मानता ही नहीं हूं की, मैं राज्यपाल हूँ’ तुम्ही जसे बोलणार, तसे मी करणार. तुम्ही बोला’ असं राज्यपाल म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बरीच वक्तव्यं वादग्रस्त ठरली आहे. त्यांनी यापूर्वी देखील अनेकदा वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. त्यामुळे सर्वस्तरावरुन त्यांच्यावर टीकाही झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यानंतर त्यांचा राज्यभर निषेध नोंदवला गेला आहे. मात्र तरीही राज्यपालांनी कोणत्याही वक्तव्याबाबत माफी मागितली नाही. यावेळी देखील त्यांनी मी स्वत:ला राज्यपाल समजत नाही असं म्हणत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. आता यावर काय प्रतिक्रिया काय येते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





















